यावल ( प्रतिनिधी )- वडीलाकडे वारंवार लग्न करून देण्याची मागणी करूनही वडील त्या कडे दुर्लक्ष करत असल्याचे भावनेतून तालुक्यातील पिळोदा येथील २८ वर्षीय मुलाने १४ जानेवारी चे रात्री , कुऱ्हाडीने वार करून वडिलांचा खुन केल्याची घटना घडली आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे .संशयित आरोपीस यावल पोलीसांनी अटक केले आहे.घटनास्थळी फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अन्नपुर्णा सिंह , पो. नि. राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली आहे .
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की १४ जानेवारी रोजी रात्री ११ चे सुमारास पिळोदा खुर्द तालुका यावल येथील देवानंद रतन कोळी वय २८ वर्ष याने ७३ वर्षीय वयोवृद्ध वडील रतन तानसिंग कोळी घरात असतांना लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खुन केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी देवानंद कोळी याची आई शुबाबाई रतन कोळी (वय ६० वर्ष ) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या वरून संशयीत आरोपी देवानंद कोळी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वारंवार सांगुन देखील लग्न लावुन देत नाही किंवा लग्नासाठी पैसे देत नाही या कारणाने मुलाने वडील हे घरात झोपलेले असतांना लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खुन केला आहे. रतन कोळी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला आहे.