अमळनेर येथील पत्रकारांवर दाखल खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी राज्य पत्रकार संघटनेचे निवेदन..
जळगाव, (प्रतिनिधी)- अमळनेर येथील पत्रकार धनंजय सोनार यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा नोंद करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा खात्री न करता गुन्हा दाखल केला असून हा दबावातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी सदर प्रकरणी निपक्षपाती चौकशी करून गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांच्या वतीने पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात यापुढे पत्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यापूर्वी चौकशी व पूर्ण खात्री करून नंतरच दखल घ्यावी, राजकीय दबावाने अशी तक्रार दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतं असतो. तरी पत्रकार धनंजय सोनार यांचेवर दाखल गुन्हा खोटा असल्याने व राजकीय दबावाने दाखल झाला असल्याची शक्यता असल्याने तो चौकशी करून ‘बी’ समरी करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.