अट्टल घरफोड्या करणारी टोळी पोलीसांच्या ताब्यात..
१० तोळे सोने व ६५० ग्रॅम चांदीसह मुद्देमाल हस्तगत ..
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात हद्दीत झालेल्या घरफोड्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीम अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत ८ घरफोड्यांची उकल केली आणि ५ सराईत आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
पोलीस अधीक्षक, यांनी दिलेल्या सुचनेवरुन पोलीस उप अधिक्षक संदिप गावीत यांचे मार्गदर्शनानुसार रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दितील महाबळ परीसरात झालेल्या घरफोडया हया सागर शिवराम डोईफोडे व त्यांच्या साथीदारांनी केल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने संशयीत सागर शिवराम डोईफोड यास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता, त्याने रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल एकुण 06 घरफोडी गुन्हयाची कबुली दिली आहे. एकुण 06 गुन्हयातील 10 तोळे सोने व 650 ग्रॅम चांदी तपासात हस्तगत करण्यात आली आहे.
सदर माहिती च्या आधारे नितेश मिलींद जाधव ,दिपक बिनोंद आढाळे ,रवि भागवत सोनवणे,अनिल ऊर्फ मारी भगवान सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयाची कबुली दिली. त्यांचे कडुन एकुण 8,00,000/- रुपये किमतीचे सोने व एकूण 60,000/- रु किमतीची चांदी तसेच एकुण 10,000/- रु किमतीची LED TV व इतर मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने केली. तसेच सर्व गुन्हाचा तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.