पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णासिंग यांच्या उपस्थितीत शांतता समिती सदस्य, पोलीस पाटलांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..
यावल दि.१५ ( सुरेश पाटील ) – निराधार असलेल्या गरजू ज्येष्ठ स्त्री पुरुषांना दत्तक घेऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात योग्य ते सहकार्य मदत केले जाईल आणि यासाठी शांतता समिती सदस्यांनी सुद्धा आपापल्या परीने गरजू निराधार ज्येष्ठ स्री – पुरुषांना दत्तक घेऊन एक सामाजिक जबाबदारी म्हणून काम करावे अशी अपेक्षा यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शांतता समिती सदस्य व पोलीस पाटलांकडून व्यक्त केली आहे. आणि या कार्याचा शुभारंभ करण्याबाबत त्यांनी सेवानिवृत्त सैनिकांशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती दिली.
शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी यावल पो.स्टे.आवारात पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णासिंग यांचे वार्षिक निरीक्षण तपासणी कार्यक्रमांतर्गत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या व पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समिती सदस्य तथा यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीत विशेष म्हणजे बेकायदा व्यवसाय करणारे आणि बेशिस्त वाहन चालवणारा विरुद्ध,थोर,महान पुरुषांचे बेकायदा पुतळे बसविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना देऊन सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून निराधार वृद्धांच्या मदतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली.
पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णासिंग यांनी उपस्थितांना सूचना देताना सांगितले की पोलीस पाटील हे पोलीस दलाचे नाक, कान, डोळे आहेत,त्यांनी आपल्या गावातील सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे, पोलीस हे एकटे काहीही करू शकत नाही. चारित्र्य पडताळणी करून ग्राम सुरक्षा दल शांतता समिती सदस्यांची नियुक्ती करून सामाजिक कार्यासाठी जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी चरित्र संपन्न सदस्यांना टी-शर्ट सुद्धा दिले जातील,सार्वजनिक कार्यक्रमात मद्य प्राशन करून डान्स व अश्लील हावभाव करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना घरी जाण्याची गर्दी असते की वर ( मृत्यू लोकात ) जाण्याची घाई असते त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना समजवायला पाहिजे,नियम मोडले तर कारवाई होईल,परंतु अति वेगाने घाईत वाहन चालविल्यास नियती त्यांचा अंत करते अशी सुद्धा जाणीव करून दिली.
मी एक व्यक्ती अधिकारी असला तरी माझा धर्म पोलीस अधिकारी म्हणून आहे, चुकीचे कामे करणाऱ्यांविरुद्ध तसेच गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केल्यास समाज पोलिसांना दुश्मन समजतात.कोणाच्या काही अडीअडचणी समस्या असल्यास त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटल्यास त्यातून समजदारीचा मार्ग काढला जातो,पोलीस स्टेशनचा दरवाजा कधीच बंद नसतो २४ तास पोलीस स्टेशन उघडे असते. इत्यादी सूचना देत यावल शहरातील निराधारांना दत्तक घेऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या दैनंदिन अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप टाकू यांनी शांतता समिती सदस्यांना देऊन तुम्ही सुद्धा या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन केले. शांतता समितीच्या बैठकीत यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील महिला पुरुष पोलीस पाटील तसेच सर्व स्तरातील शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.शांतता समिती सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली.