रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी..
खरिपाच्या तोंडावर वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी - रोहिणी खडसे
रावेर– तालुक्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या प्रचंड वेगाच्या वादळी वार्यासह अवकाळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असुन अगोदरच वाढते तापमान घसरलेले केळीचे दर यामुळे असमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकर्यासमोर या नैसर्गिक आपत्तीमुळे संकट निर्माण झाले आहे. केळी सारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक क्षणार्धात डोळ्यांसमोर नष्ट होताना शेतकरी बांधवांना पहावे लागले.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारात शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे तात्काळ प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्याबाबत आणि विमा कंपन्यांना निर्देश देण्या बाबत चर्चा केली
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या
जळगाव जिल्ह्यात एप्रिल मे महिन्यात कमाल तापमानाचा पारा हा 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे. या वाढत्या तापमानामुळे मोठ्या मेहनतीने वाढवलेल्या केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांना तातडीने हवामानावर आधारीत फळ पिकविम्याची भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. यातच काल केळी बागांना वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने जिवापाड मेहनत घेऊन अति तापमानपासून वाचवलेल्या
केळी बागा भुईसपाट होऊन शेतकरी बांधवाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करण्या बाबत व विमा कंपन्यांना योग्य ते निर्देश देण्या बाबत रावेर तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली तसेच सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने आचार संहितेचा नियम शिथिल करून खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी त्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील,अजय पाटील,प्रदीप पाटील,किरण पाटील,सतीश पाटील,सुनील पाटील,सुधीर पाटील,हरी पाटील उपस्थित होते