इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहिती अधिकार कक्षेत : राज्य माहिती आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय..
आरटी आय कार्यकर्ते ऍड. दिपक सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश.

जळगाव : रक्तपेढी क्षेत्रातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहितीचा अधिकार अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण ठरत आहे. सोसायटीने जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांची अधिनियमाच्या कलम ५ (१) मधील तरतुदीनुसार नियुक्ती करावी. माहिती अधिकार कार्यकर्ते ऍड. दीपक सपकाळे यांच्या मागणीनुसार माहिती विनामूल्य पुरविण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्त बिपीन गुरव खंडपीठ नाशिक यांनी दिले आहेत. यामुळे आरटीआय कार्यकर्ते ऍड. दीपक सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे,
अपिलार्थी ऍड. सपकाळे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ (३) अन्वये रेडक्रास सोसायटीचे जनमाहिती अधिकाऱ्यांकडे २१ मार्च ते २० जून २०२० कालावधीतील इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात झालेला संपूर्ण पत्रव्यवहार, जिल्हाधिकाऱ्यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटी बाबत घेतलेल्या निर्णय आदेशाच्या प्रती मिळाव्यात, इंडियन रेडक्रॉस सोसायटीसाठी निधीसंदर्भात समिती गठीत केल्याच्या आदेशाची माहिती मागितली होती. मात्र, इंडियन रेडक्रास सोसायटी माहिती अधिकार कक्षेत येत नसल्याचे लेखी सांगण्यात आले. याबाबत दुसरी अपिल सुनावणी मध्ये अपीलार्थींनी सादर केलेले पुराव्यावरून माहिती आयुक्तांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना इंडियन रेडक्रास सोसायटीचे जनमाहिती अधिकारी म्हणून घोषित केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत अपिलार्थीस त्यांच्या माहिती अर्जाच्या अनुषंगाने मागितलेली माहिती विनामूल्य पुरवावी. इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहितीचा अधिकार अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरण ठरत असल्याने त्यांनी जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांची अधिनियमाच्या कलम ५ (१) मधील तरतुदीनुसार नियुक्ती करावी, असे आदेश देण्यात आले.
अशी माहिती ऍड. दिपक सपकाळे यांनी दिली
ईतर महत्वाच्या बातम्या
ऐनपुर येथे गौण खनिजांची लूट… महसूल विभाग घेतेय झोपेचे सोंग..