
जळगाव – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या १५ फेब्रुवारी रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघात चार सभांचे आयोजन केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे, अद्याप जिल्ह्यातील कोणत्याही पक्षाने उमेदवारांची घोषणा केली नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेत जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली आहे. त्यामुळे उमेदवार निश्चितीपूर्वीच पक्षाकडून सभांचे नियोजन सुरू आहे.
आदित्य ठाकरे हे १५ रोजी नाशिक येथून रेल्वेने जळगावात येणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता जळगाव शहरात सभा होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता शिरसोली येथे, दुपारी ५ वाजता कासोदा (ता. एरंडोल ) येथे तर सायंकाळी ६ वाजता भडगाव येथे सभा होणार आहे. दरम्यान, ठाकरेंच्या सभांचे ठिकाण असलेले चारही विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमने समाने आल्याचे पाहायला मिळणार आहेत.