जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला : तरुण गंभीर जखमी..

जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात रविवारी सायंकाळी जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर कोयता, चाकू व रॉडने तुफान हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी : जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे असून, तो रविवारी (दि. १४ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत रामेश्वर कॉलनी येथील राज शाळेजवळ बसला होता. त्याचवेळी काही तरुणांनी जुन्या वादातून अचानक हल्ला चढवला. लोखंडी कोयता, चाकू व रॉडने सलग वार करत त्याला गंभीर जखमी केले.हल्ला झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी हर्षलला खाजगी वाहनातून तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले असून, पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कळते.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फूटेजचीही पाहणी केली जात आहे.