ममुराबाद रोडवरील एल के फॉर्म वर पोलिसांची धाड : बोगस कॉल सेंटर उध्वस्त..

जळगाव – ममुराबाद रोडवरील एल. के. फॉर्म येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठ्या आंतरराज्यीय ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत कॉल सेंटरचा मालकासह एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ३१ लॅपटॉपसह संपूर्ण सेट-अप जप्त करण्यात आला आहे. यात चौकशीसाठी फॉर्म हाऊस चे मालक ललित कोल्हे यांना देखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शनिवारी (दि. २७) रात्री उशिरा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना या बोगस कॉल सेंटरबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे, रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एल. के. फॉर्म येथे धाड टाकण्यात आली. ठिकाणी परदेशी नागरिकांना लक्ष्य करून फसवणुकीसाठी वापरले जाणारे अत्याधुनिक उपकरणांसह संपूर्ण कॉल सेंटर आढळून आले.
प्राथमिक तपासणीत उघड झाले की, आरोपी परदेशी नागरिकांना विविध आमिष दाखवून फसवत होते. स्वतःला ‘अधिकृत एजंट’ असल्याचे सांगून, डेटा चेक करण्याच्या बहाण्याने ते विदेशी लोकांची आर्थिक फसवणूक करत होते.या कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले की, या कॉल सेंटरमध्ये २० ते २५ जण काम करत होते. अटक आरोपींपैकी बहुतांश हे राज्याबाहेरील असल्याचे समोर आले असून, या रॅकेटचा आंतरराज्यीय स्तरावर फैलाव असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फॉर्मचे स्थानिक मालक माजी महापौर ललित कोल्हे यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जप्त केलेल्या लॅपटॉप्स, डेटा आणि इतर उपकरणांची कसून तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा करून फसवणुकीचे देशात असलेले रॅकेटचे जाळे शोधण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.