जळगावात जुन्या वादातून धारदार शस्त्राने तरुणाची निघृण हत्या..

जळगाव – शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून दोन तरुणांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) या२७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसऱ्याच्या रात्री सदर तरुण एकता मित्र मंडळ येथे उभा असताना, त्याच्यावर राहत्या घराजवळील दोन तरुणांनी अचानक हल्ला केला.दोन्ही हल्लेखोरांनी जुन्या वादाचा राग मनात धरून धारदार शस्त्राने थेट तरुणाच्या पोटावर व मांडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला मित्रांनी तातडीने दुचाकीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. त्याला अतीदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. परंतु, तासाभरातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. परिसरात मोठी गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पथकाने रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.