जळगाव जिल्हा पोलिसांची “ऑल आऊट मोहीम” ; २५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, १९५ आरोपींवर कारवाई..

जळगाव : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शना खाली जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या “ऑल आऊट मोहीम” अंतर्गत मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील ३६ पोलीस स्टेशन व ०३ वाहतूक शाखांनी संयुक्तरित्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन राबवत २५,१३,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १९५ आरोपींवर कारवाई, १०१ गंभीर गुन्हे दाखल, तसेच ४,१८,६२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत अवैध दारू, जुगार, शस्त्रबंदी, अंमली पदार्थ, वाहतूक नियमभंग, हरविलेले बालक व महिला शोध मोहीम, तसेच असामाजिक प्रवृत्तींवर विशेष कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या जोरदार मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसल्याचे चित्र दिसून आले
अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून १३६ केसेसमध्ये तब्बल २५.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुका, भुसावळ तालुका, यावल, मुक्ताईनगर, पिंपळगाव, चोपडा ग्रामीण, सावदा व पाचोरा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या.याशिवाय जुगार कायद्यान्वये ५७ केसेस दाखल करून ५७ आरोपींवर कारवाई, शस्त्र नियंत्रण कायद्यानुसार २ केसेसमध्ये तलवार व चाकू जप्त, तर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार १५ केसेस दाखल करण्यात आल्या.
वाहतूक विभागानेही या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.ड्रंक अँड ड्राईव्हच्या २७२ केसेसमध्ये २,८२,३०० रुपयांचा दंड, तर बुलेट सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटच्या १५० केसेसमध्ये १,०४,१०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच COTPA अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर २३३ केसेस दाखल करून ३२,२२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
“मुस्कान मोहिमे” अंतर्गत ३४ हरविलेले बालक व महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तसेच मानवी वाहतूक रोखण्यासाठी १०५ हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यात आली. शाळा व महाविद्यालय परिसरात ३३ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. बीएनएसएस कलम १२६ अंतर्गत १२२ इसमांवर, कलम १२९ अंतर्गत ११ इसमांवर, तर तडीपार उल्लंघनाच्या १० केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ६ केसेस नोंदविण्यात आल्या.
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह रिल्स तयार करणाऱ्या ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सायबर शाखेने यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ७७ फरार आरोपींची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १३ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. संपूर्ण जिल्ह्यात २१ ठिकाणी नाकाबंदी करून संशयितांची तपासणी करण्यात आली.
जिल्हा पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढेही अचानक नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन व “ऑल आऊट” मोहिमा राबवून गुन्हेगारी प्रवृत्ती व असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल.