जळगाव

10 हजाराची लाच घेणाऱ्या ZP बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्याकडे सापडले 5 कोटीचे घबाड..

घर आणि बँक लॉकरमधून ५ कोटी १६ लाखांची मालमत्ता उघड; सोन्याचे बिस्किट, चांदी आणि प्लॅटिनमचा मोठा साठा!

जळगाव : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणाने आता मोठे धक्कादायक वळण घेतले आहे. अवघ्या १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या घरझडतीत आणि बँकेच्या लॉकरमध्ये तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, चांदीच्या वस्तू, प्लॅटिनमचे दागिने आणि दोन घरांसह एवढी मोठी मालमत्ता समोर आल्याने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिसोदे यांच्यावर २ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कारवाई केली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घरझडतीत दोन घरे आणि लाखोंची रोकड

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या घरझडतीत आदर्शनगर परिसरातील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय ७ लाख ९७ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम आणि घरातील वस्तूंची अंदाजित किंमत २४ लाख ३९ रुपये आढळली आहे.घरझडतीत मिळालेल्या मालमत्तेचा एकूण आकडा १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपये इतका आहे.

बँक लॉकरमध्ये सोन्याचा खजिना!

जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मौल्यवान दागिन्यांचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३ रुपये किमतीचे तब्बल २,५२४.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, पट्ट्या, चेन, पेंडल, लॉकेट आणि बांगड्यांचा समावेश आहे.

तसेच १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये किमतीचे ११,६३३.७ ग्रॅम चांदीचे दागिने व वस्तू आणि ३ लाख ५५ हजार २८६ रुपये किमतीचे १०१.०२ ग्रॅम प्लॅटिनमचे दागिने मिळून आले आहेत.

बँक लॉकरमधील या मौल्यवान वस्तूंची एकूण किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीत नमूद आहे.

५ कोटींच्या मालमत्तेने जिल्हा परिषदेत खळबळ

दहा हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणातून सुरू झालेल्या कारवाईत एका अधिकाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आढळून आलेल्या मालमत्तेचे ज्ञात उत्पन्नाशी प्रमाण काय, या मालमत्तेचे स्रोत कोणते आणि त्याबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदर कारवाई बँक लॉकरची झडती पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने तर घरझडतीची कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या पथकाने, केली.

१० हजारांच्या लाचेपासून सुरू झालेल्या या प्रकरणात ५ कोटींची मालमत्ता समोर आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कारभाराबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे