जळगाव पोलीस अधीक्षकांचा अनोखा उपक्रम : उन्हात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांना मायेची सावली..
उन्हाच्या तीव्र झळांमध्ये कष्ट करणाऱ्या विक्रेत्यांना जळगाव पोलिसांचा दिलासादायक हात..

जळगाव : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तीव्र तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा कडक उन्हामध्येही अनेक लहान विक्रेते रस्त्याच्या कडेला बसून प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किरकोळ वस्तूंची विक्री करताना दिसतात. या मेहनतकऱ्यांच्या अडचणी ओळखून जळगाव पोलीस अधीक्षकांनी एक संवेदनशील आणि समाजाभिमुख उपक्रम राबवत त्यांना मायेची सावली देण्याचा प्रयत्न केला आहे.

जळगाव पोलीस दलातर्फे शहरातील सुमारे २० गरजू आणि मेहनती रस्त्यावरील विक्रेत्यांची निवड करण्यात आली. ट्रॅफिक कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये या विक्रेत्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ्या छत्र्या तसेच थंड पाणी साठवण्यासाठी मिल्टनच्या पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे, या विक्रेत्यांची निवड अत्यंत बारकाईने करण्यात आली होती. रोज कडक उन्हात बसून संघर्ष करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाच या उपक्रमासाठी प्राधान्य देण्यात आले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यातही मदतीसाठी पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास दिला.
या उपक्रमामुळे अनेक विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. “पोलीस फक्त कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत नाहीत, तर समाजातील गरजू लोकांच्या वेदनाही समजून घेतात,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
जळगाव पोलीस दलाचा हा उपक्रम सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरत असून, सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे.