जळगावात महिलांच्या सुरक्षेसाठी “दामिनी पथक” पुन्हा सक्रिय..

जळगाव – शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले “दामिनी पथक” काही दिवसांपासून बंद असल्याची बाब चिंताजनक होती. महिलांवरील वाढते अत्याचार, छेडछाड आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर असे विशेष पथक सक्रिय न राहणे ही गंभीर बाब होती. मात्र, ही बाब समोर येताच पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत आजपासून दामिनी पथक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

पोलिस अधिक्षकांनी स्वतः नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या महिला अमलदारांशी चर्चा करून त्यांच्या कामाचे स्वरूप, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. पथकाला एक चारचाकी व दोन दुचाकी वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे त्यांच्या कामाची गती आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

दामिनी पथकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांची आणि विद्यार्थिनींची सुरक्षा व संरक्षण सुनिश्चित करणे. छेडछाड, अत्याचार, घरगुती हिंसा यांसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, महिलांना निर्भयपणे तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे हे या पथकाचे प्रमुख ध्येय आहे. तसेच महिलांमध्ये जागरूकता वाढवून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हेही तितकेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
कामकाजाच्या दृष्टीने, दामिनी पथक शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालते. विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ याबाबत मार्गदर्शन करणे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याची माहिती देणे, तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे ही त्यांची दैनंदिन जबाबदारी आहे. महिला हेल्पलाईन १०९१ वर आलेल्या तक्रारींना शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देणे आणि अनेक ठिकाणी १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे.
याशिवाय, पीडित महिलांना कायदेशीर, वैद्यकीय आणि मानसिक आधार देणे, समुपदेशन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि समाजात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना व मुलींना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे हेही या पथकाचे महत्त्वाचे काम आहे. या सर्व माध्यमांतून महिलांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणे हीच दामिनी पथकाची खरी ताकद ठरते.तथापि, केवळ पथक सुरू करणे पुरेसे नसून त्याचे सातत्याने प्रभावीपणे कार्यरत राहणे गरजेचे आहे. प्रशासनाची सततची देखरेख, आवश्यक साधनसामग्री आणि नागरिकांचे सहकार्य यामुळेच या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश मिळू शकते.
दामिनी पथकाचे पुनरागमन हे जळगाव शहरासाठी सकारात्मक पाऊल आहे. आता या पथकाच्या माध्यमातून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि आत्मविश्वास वाढेल, तसेच समाजात कायद्याचा धाक आणि विश्वास दोन्ही दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त करणे उचित ठरेल.