जळगावकरांच्या सुरक्षिततेसाठी उपमहापौरांनी घेतली आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक..

जळगाव | प्रतिनिधी – नवापूर शहर परिसरातील पोल्ट्री फार्म उद्योगामध्ये बर्ड फ्लू संसर्ग वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. शहरात कोणत्याही परिस्थितीत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नये आणि नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरातील चिकन मार्केट, पोल्ट्री फार्म आणि मांस विक्री केंद्रांचे विशेष सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. आजारी अथवा मृत कोंबड्यांची त्वरित नोंद घेऊन संशयित पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.यासोबतच नवापूर किंवा बाधित भागातून येणाऱ्या पोल्ट्री वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यकतेनुसार शहरातील प्रवेश बिंदूंवर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
चिकन मार्केट, कत्तलखाने आणि पोल्ट्री परिसरात नियमित फवारणी व सॅनिटायझेशन मोहीम राबवून स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. दुर्गंधी किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.आरोग्य विभागाकडून विशेष पथके तयार करण्यात येणार असून, संशयित परिस्थिती आढळल्यास त्वरित तपासणी केली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
नागरिकांमध्ये अफवा पसरू नयेत यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करावे, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे. बाजार परिसरात माहितीपत्रके व सूचना फलक लावण्यात येणार आहेत.
दरम्यान, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मृत पक्षी आढळल्यास त्यांची वैज्ञानिक पद्धतीने सुरक्षित विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शहरातील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांनाही सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. ताप, श्वसन त्रास किंवा संसर्गासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करण्यास सांगण्यात आले असून आवश्यक औषधसाठा व सुरक्षा साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“जळगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. कोणतीही हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
तसेच सर्व विभागांनी समन्वय राखून दररोजचा अहवाल सादर करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.