जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : ९ हून अधिक गुन्हे दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त..

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आणि भुसावळ बीट पथकाने अवैधहातभट्टी दारू व रसायन साठ्याविरोधात मोठी मोहीम राबवत सलग कारवाया केल्या आहेत. या कारवायांमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. १ मे २०२६ रोजी अशोक तारू निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, जळगाव यांनी ४ गुन्हे दाखल केले. त्यामध्ये २ वारस व २ बेवारस गुन्ह्यांचा समावेश असून २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तब्बल ९५०० लिटर रसायन व १४५ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. एकूण ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
त्याच दिवशी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ बीट क्रमांक २ यांनी देखील धडक कारवाई करत २ गुन्हे नोंदविले. त्यामध्ये १ वारस व १ बेवारस गुन्ह्याचा समावेश आहे. या कारवाईत २२०० लिटर रसायन आणि ४० लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून ८७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यानंतर दि. २ मे २०२६ रोजी अशोक तारू निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, जळगाव यांनी पुन्हा ३ गुन्हे दाखल करत ३ आरोपींना अटक केली. या कारवाईत ६४०० लिटर रसायन व १७८ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणातील मुद्देमालाची किंमत २ लाख ७५ हजार ५०० रुपये इतकी आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू केलेल्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांना मोठा आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. विभागाकडून पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.