दुभाजक सुशोभीकरणाच्या नावाखाली मनपा नियमांचे उल्लंघन ? भंगाळे गोल्ड चा करार रद्द करा – ॲड. पियुष पाटलांची मागणी

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण व देखभाल करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित संस्था किंवा व्यावसायिकांनी दुभाजकांची दुरुस्ती, रंगरंगोटी, वृक्षारोपण, स्वच्छता व नियमित देखभाल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या नियमांनुसार संबंधित जाहिरात फलकांमध्ये ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी राखीव ठेवणे आवश्यक असून उर्वरित ६० टक्के जागा संबंधित व्यावसायिकांना जाहिरातीसाठी वापरण्याची परवानगी आहे. तसेच प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटर अंतर ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र, स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा मार्गावरील दुभाजकांवर भंगाळे गोल्ड व्यवस्थापनाकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केला आहे. संबंधित ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर १०० टक्के स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करण्यात आल्याचा आरोप असून महानगरपालिकेचा कुठेही उल्लेख नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जाहिरात फलकांमधील आवश्यक १० मीटर अंतराचाही नियम पाळण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
यापूर्वीही भंगाळे गोल्डकडून शहरात अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्या प्रकरणात महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही समोर आले आहे. तरीदेखील नियमभंग सुरूच असल्याने संबंधित करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी ॲड. पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पर्यावरण विभाग अभियंता, महापौर, आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर समान आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भंगाळे गोल्ड व्यवस्थापनाशी संबंधित नातेवाईक हे जळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक तसेच माजी महापौर असल्याचा उल्लेख करत प्रशासनावर दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोपही ॲड. पाटील यांनी केला आहे.
एकीकडे लहान व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाकडून कठोर कारवाई केली जाते, तर दुसरीकडे प्रभावशाली व्यावसायिकांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.