१.५० लाखाची लाच : उपनिबंधकासह खासगी पंटर ACB च्या जाळ्यात..

जळगाव : अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरवून १.५० लाख लाचेसाठी उपनिबंधकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जळगावात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांविरुद्ध अवैध सावकारी व्यवसायासंदर्भात चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवाल अनुकूल पाठवून तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी जगदीश बारी उपनिबंधक सह संस्था, जळगाव (वर्ग-१) यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.
याप्रकरणी तक्रारदारांनी १८ मे २०२६ रोजी जळगाव ACB कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB ने पंचांसमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. पडताळणीदरम्यान उपनिबंधक जगदीश बारी यांनी “मागील प्रकरणात तुम्ही वकील लावल्यामुळे आमचे नुकसान झाले, त्यामुळे नकारात्मक अहवाल दिला होता; आता अनुकूल अहवाल पाठवितो,” असे सांगत लाचेची मागणी कायम ठेवली होती.त्यानुसार लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता १ लाख ५० हजार रुपये खाजगी इसम देविदास पाटील (मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन) यांच्याकडे २० मे रोजी देण्याचे ठरविण्यात आले होते.
आज ACB ने सापळा रचून बी.जे. मार्केट येथील जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनच्या कार्यालयात कारवाई केली. यावेळी खाजगी इसम देविदास पाटील हे तक्रारदारांकडून १ लाख ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे
सदर कारवाई
जळगाव एसीबी चे पोलीस उप अधीक्षक, योगेश ठाकूर,पोलिस निरीक्षक, रेश्मा अवतारे,पो. नि. हेमंत नागरे, पोहेकों/बालु मराठे, मपोहेकों / संगिता पवार, पो. कॉ/मनोज पाटील व पो. कॉ. सचिन चाटे यांनी केली.