जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी यांच्या सूचनेनुसार जळगावात रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर : पाणी बचतीसाठी व्यापक कृती आराखडा..

जळगाव –  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्या सूचनेनुसार शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संधारण) धोरणाची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या वाघूर धरण येथे सुमारे 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे सात महिने पुरेल, अशी माहिती समोर आली आहे. शहरात पूरक जलस्रोत म्हणून 43 विहिरी आणि 60 बोअरवेल कार्यरत आहेत.

उपमहापौरांनी प्रशासनाला निर्देश देताना शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी संकुले, गृहसंकुले, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

दरवर्षी वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यावर भर

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहून जात असल्याने भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे व जमिनीत मुरवणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले.

पाणी बचतीसाठी 20 टक्के लक्ष्य

महानगरपालिका प्रशासनाने शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान 20 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी गळती नियंत्रण, अनधिकृत वापरावर कारवाई, पुनर्वापर आणि जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.

कार वॉश व्यवसायांवर निर्बंधांचे संकेत

पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या नव्या कार वॉश व्यवसायांना परवानगी देताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा व्यवसायांनी पुनर्वापरित किंवा प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाला सांगण्यात आले आहे.

पाणी चोरी व गळतीवर कठोर कारवाई

शहरातील जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीग्रस्त भागांची तातडीने दुरुस्ती, अनधिकृत कनेक्शन, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड आणि पाणी चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

RO वेस्ट वॉटर पुनर्वापर आणि जनजागृती मोहीम

घरगुती व व्यावसायिक स्तरावर RO वेस्ट वॉटरचा साफसफाई, फ्लशिंग व बागकामासाठी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच “माझे पाणी – माझा अभिमान” अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. उपमहापौर मनोज चौधरी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आज पाणीसाठा समाधानकारक असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पुनर्वापर आणि अपव्यय रोखणे ही काळाची गरज आहे.”

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे