७१,७०० रुपयांची लाच : जळगाव भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भूकरमापक ACB च्या जाळ्यात..
एकाच महिन्यात भूमी अभिलेख कार्यालयाचे 2 लाचखोर भुकरमापक ACB च्या जाळ्यात

जळगाव – शेतकऱ्यांच्या हक्काच्या कामासाठी सरकारी शुल्क भरूनही भुकरमापकाने लाचेची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राहुल ताराचंद कोळी (वय ३२) याने शेतजमिनीची मोजणी व गट हिस्सा-पोटहिस्सा पडताळणी करून देण्यासाठी तब्बल ७० हजार रुपयांची लाच मागितली. इतकेच नव्हे तर नोटीस खर्च आणि खाजगी मदतनीसाच्या नावाखाली आणखी १,७०० रुपये उकळले अखेर ७१,७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडून भ्रष्टाचाराचा काळा चेहरा उघड केला.
तक्रारदार शेतकरी यांनी आपल्या शेतीच्या मोजणीसाठी नियमानुसार अर्ज करून शासकीय चलन भरले होते. मात्र, काम करण्याऐवजी भूकरमापक राहुल कोळी याने “काम करायचे असेल तर पैसे द्यावेच लागतील” अशी भूमिका घेत थेट ७० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने १७ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
पडताळणीदरम्यान डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील यानेही नोटीस पाठविण्यासाठी ६२५ रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २९ जुलै रोजी करंज (ता. जि. जळगाव) येथे शेतजमिनीची मोजणी पूर्ण झाल्यानंतर बसस्टॉपजवळ अंतिम बोलणी झाली. यावेळी भूकरमापक राहुल कोळी याने स्वतःसाठी व कार्यालयाच्या नावाखाली ७० हजार, नोटीस खर्च १,२०० आणि खाजगी मदतनीसासाठी ५०० रुपये अशी एकूण ७१,७०० रुपयांची मागणी करून ती पंचांसमक्ष स्वीकारली.
लाच स्वीकारताच ACB च्या पथकाने सापळा यशस्वी करत राहुल कोळीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित), कलम ७ व ७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती
एकाच महिन्यात जळगाव भूमी अभिलेख कार्यालयाचे 2 लाचखोर भुकरमापक लाच घेतांना सापडल्या मुळे एकच खळबळ उडाली आहे
या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा प्रकरणांमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.