ब्रेकिंग

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार : कृष्णभक्तीतून समानतेचा जागर..

ढोलपथकाचा दणदणाट, रिदमिक योगा, रोप मल्लखांब, मर्दानी खेळ व नृत्याच्या साक्षीने गोपिकांनी फोडली प्रेरणादायी युवतींची दहीहंडी

जळगाव दि. 5 प्रतिनिधी – ढोलपथकाच्या दणदणाटात, रिदमिक योगा, रोप मल्लखांब, मर्दानी खेळ आणि कृष्णभक्तीने नटलेल्या नृत्याविष्कारातून शिवतीर्थ मैदानावर युवतींच्या दहीहंडीने नारीशक्तीचा अद्वितीय जागर घडवला. गोपिकांनी साहस, समता आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम साकारत मानवी मनोऱ्यांतुन दहीहंडी फोडली, तर महिलांच्या कर्तृत्वाला कृतज्ञतेची मानवंदना देत प्रत्येक युवतीने प्रेरणादायी आयुष्य घडवावे, असा संदेश हजारो जळगावकरांना या उत्सवातून देण्यात आला.

यंदा प्रथमच रोख पारितोषिके प्रथम तिन संघांना देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे एल एच पाटील पब्लिक स्कूल या संघाला ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाचा नुतन मराठा महाविद्यालय संघाला २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या जी. एच. रायसोनी महाविद्यालय संघाला ११ हजार १११ रुपये अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके वाटप करण्यात आली ही पारितोषिके जैन इरिगेशनने प्रायोजित केली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंजुषा भिडे, कामिनी धांडे, नेहा देशमुख यांनी काम पाहिले. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्यांना व सहभागी सर्व संघाला विशेष स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर दिपमाला काळे जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे,अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक संदीप गावित, मनपा आयुक्त आदित्य जिवने, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, बीएसएनएलचे व्यवस्थापक गोविंद प्रसाद गुप्ता, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ. केतकी पाटील, डॉ. जयवंत नागुलकर, यांच्यासह उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व युवाशक्ती फाऊंडेशन चे विराज कावडिया व सदस्य उपस्थित होते.

६८५ महिला गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

युवतींची दहीहंडी २०२६’मध्ये किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. विद्यालय,  केसीई सोसायटी मुलींचे वसतिगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एस. ए. बाहेती महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय, के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेज, हरिजन कन्या छात्रालय, एल. एच. पाटील पब्लिक स्कूल, के‌. के. इन्स्टीट्यूट आफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल आदी शाळा-महाविद्यालयांतील 13 महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवती सहभागी झाले होते. सहभागी युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती.

शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादक दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडले होते. मर्दानी खेळ, चिमुकल्यांचे सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे प्रमुख आकर्षण ठरले. यशस्वीतेसाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन च्या सर्व सहकारी यांनी सहकार्य केले. अय्याज मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे