
जामनेर : शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेल्या स्किम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर येथील भूमी अभिलेख भुकरमापक भगवान रोहीदास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे पंचांसमक्ष करण्यात आली.
तक्रारदार यांना नेरी बु. ता. जामनेर येथील त्यांच्या शेतीची मोजणी करायची होती. त्यासाठी स्किम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती आवश्यक असल्याने त्यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे अर्ज केला होता. या कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी लोकसेवक भगवान गायकवाड यांनी तक्रारदाराकडे ७०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी ८ सप्टेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी तक्रारदार व आरोपी यांच्यात तडजोड होऊन २०० रुपये लाच देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारण्यास गायकवाड यांनी संमती दर्शविली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे भगवान गायकवाड यांनी पंचांसमक्ष २०० रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, भगवान गायकवाड यांच्याविरुद्ध यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी २०१२ मध्ये बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाचखोरीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल होणारा हा दुसरा गुन्हा असल्याचे समजते.