जळगाव जिल्ह्याला सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के..

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात आज शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जळगाव शहरासह भुसावळ, वरणगाव, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुखपुरी, तालुका भागलपूर परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत असून, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचा प्रभाव सीमेलगतच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही जाणवला.
सकाळी अचानक घरातील वस्तू आणि इमारतींना हादरे जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. जवळपास अर्धा मिनिट धक्के जाणवल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अद्याप जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, भूकंपाची अधिकृत तांत्रिक माहिती, केंद्रबिंदू आणि जिल्ह्यातील धक्क्यांची नेमकी तीव्रता याबाबत अधिक तपशील मिळणे बाकी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.