१५ हजाराची लाच : MECB च्या सहाय्यक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञ ACB च्या जाळ्यात..

जळगाव : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहात पकडले. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी पांडे चौकात ही सापळा कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहाय्यक अभियंत्यासह महावितरणच्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञांची नावे समोर आली आहेत.
या प्रकरणा मध्ये विशाल वसंत नेमाडे (वय ३७, सहाय्यक अभियंता, वर्ग-२), भरत कडु तायडे (वय ४५, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३) आणि रविंद्र छन्नु पाटील (वय ४१, वरिष्ठ तंत्रज्ञ, वर्ग-३) या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही महावितरणच्या जळगाव शहर महसूल व देयक उपविभागात कार्यरत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून, त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसविण्यात आले होते. दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता तिन्ही महावितरणचे कर्मचारी तक्रारदार यांच्या घरी गेले. तेथे नवीन वीज मीटरची तपासणी करून घरातील विद्युत उपकरणांचे फोटो काढले.
त्यानंतर भरत कडु तायडे याने तक्रारदार यांना फोन करून पांडे चौकात बोलावले. तेथे घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे तसेच सर्व्हिस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे सांगितले. वीज चोरीची कारवाई टाळायची असल्यास ४० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
या लाचेच्या मागणीविरोधात तक्रारदार यांनी त्याच दिवशी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत तक्रारदार यांच्या घरी मागणीची पडताळणी केली. यावेळी भरत तायडे आणि रविंद्र छन्नु पाटील यांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसह विशाल वसंत नेमाडे सहाय्यक अभियंता, यांच्यासाठी सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम भरत तायडे स्वतः स्वीकारणार असल्याचेही निष्पन्न झाले
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी पांडे चौकात एसीबीने सापळा रचला. यावेळी भरत तायडे याने लाचेची रक्कम विशाल वसंत नेमाडे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांनी तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महावितरणमधील या लाचखोरीच्या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.