जळगावात पोलिसांची कारवाई; ११.१७ लाखांचे अमली पदार्थ जप्त..
एमआयडीसी हद्दीत १ किलो ९६३ ग्रॅम एफेड्रिनसह २ किलो ११४ ग्रॅम गांजा हस्तगत : एकास अटक

जळगाव : जिल्ह्यातील अमली पदार्थांची तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत १ किलो ९६३ ग्रॅम एफेड्रिन आणि २ किलो ११४ ग्रॅम गांजा, तसेच बर्गमॅन मोपेड असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एमआयडीसी परिसरात एका व्यक्तीकडून ‘एफेड्रिन’ या अमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहन काळे यांना कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या कायदेशीर परवानगीने तसेच राजपत्रित अधिकारी चंद्रकांत अरुण बोडरे आणि पंचांच्या उपस्थितीत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.४० वाजता एमआयडीसी हद्दीतील नारियलवाला बाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी काळ्या रंगाच्या बर्गमॅन मोपेडवरून आलेला नूर मोहम्मद पटेल पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष मोपेडच्या डिक्कीची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची स्फटिकयुक्त पावडर व गांजा आढळून आला.
जप्त मुद्देमाल
– एफेड्रिन – १ किलो ९६३ ग्रॅम : अंदाजे किंमत ९ लाख ८१ हजार ५०० रुपये
– गांजा – २ किलो ११४ ग्रॅम : अंदाजे किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये
– बर्गमॅन मोपेड : किंमत ३० हजार रुपये
असा एकूण ४ किलो ७७ ग्रॅम अमली पदार्थ व वाहनासह ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त केलेला रासायनिक पदार्थ ‘एफेड्रिन’ आणि दुसरा पदार्थ ‘गांजा’ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक प्रभाकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०७०४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ९(अ), २५(अ), ८(क) सह २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार करीत आहेत.
