विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी..

जळगाव, दि. १९ सप्टेंबर : प्रमुख गणेश विसर्जन मिरवणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना जळगाव शहरातील विसर्जन मार्गाची महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. शिवतीर्थ चौक ते टॉवर चौक या मार्गाची पाहणी करताना रस्त्यांवरील खड्डे, लटकणाऱ्या केबल्स आणि अस्वच्छता आढळून आल्याने महापौरांनी महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. “पुढील दोन दिवसांत शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवा. खराब साईडपट्ट्या दुरुस्त करून रस्ते समतल करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच मिरवणुकीत अडथळा निर्माण होऊ शकणाऱ्या लटकत्या वायरी व केबल्स तातडीने उंच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
रस्त्यावर कचरा करणाऱ्या हॉकर्सवर संताप
पाहणीदरम्यान नेहरू चौकात एका हॉकर्सकडून रस्त्यावरच कचरा व अस्वच्छता केल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर संताप व्यक्त करत संबंधित हॉकर्सवर तात्काळ दंडात्मक कारवाई करून त्याचे वाहन जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. महापौरांच्या सूचनेनंतर संबंधित हॉकर्सने तातडीने झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला.
डांबरीकरणाच्या कामाच्या दर्जाचीही पाहणी
टॉवर चौक परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचीही महापौरांनी पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा तपासत मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामात गुणवत्ता राखण्याच्या तसेच निकृष्ट दर्जाचे काम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना त्यांनी दिल्या.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील खड्डे आणि विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आवश्यक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.