अवैध गुटखा तस्करीविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १६.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त..

जळगाव/चाळीसगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात जळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. चाळीसगाव शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन जणांना ताब्यात घेत गुटखा, पानमसाला व आयशर वाहनासह एकूण १६ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिरापूर रोडवरील ठाकुरवाडी परिसरातील विनोद किराणा स्टोअर्स येथे पोलिसांनी सापळा रचला. कारवाईदरम्यान नचिकेत सुनील येवले (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ४४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील जुने बी. जे. मार्केट परिसरात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मधुकर धोंडू इंगळे (वय ४८, रा. खेडी, शिवनगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील आयशर वाहन क्रमांक MH-48-AY-1848 तपासले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला.
या कारवाईत १ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा गुटखा व पानमसाला आणि १५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, असा एकूण १६ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. क्र. ३१२/२०२६ नुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध
जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला नेमका कोठून आणण्यात आला होता, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अशा प्रकारची अवैध विक्री किंवा वाहतूक आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.
