२५ हजारांची लाच : जामनेर तहसीलच्या महसूल सहाय्यकासह खाजगी इसम ACB च्या जाळ्यात..

जामनेर : शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मिळावा यासाठी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी जामनेर तहसील कार्यालयात करण्यात आली.
या कारवाईत प्रविण सुपड्डु गांगुर्डे, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय जामनेर आणि योगेश रामलाल वखरे , वकील (खासगी इसम), यांना ताब्यात घेतले.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे जामनेर शिवारात गट क्रमांक ४०७ मध्ये शेत असून शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मिळावा यासाठी त्यांनी सन २०२२ मध्ये तहसील कार्यालय जामनेर येथे वहिवाटीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावर तहसीलदारांकडे वेळोवेळी सुनावणी झाली असून प्रकरण अंतिम निकालासाठी प्रलंबित होते.
तक्रारदार व त्यांच्या भावाने महसूल सहाय्यक प्रविण गांगुर्डे यांची भेट घेतली असता, सदर दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. त्यावेळी खासगी व्यक्ती योगेश वखरे याने महसूल सहाय्यक गांगुर्डे यांच्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. तसेच गांगुर्डे यांनी स्वतःसाठी योगेश वखरे मार्फत लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंचांसमक्ष योगेश वखरे याने २५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम त्याने प्रविण गांगुर्डे यांना दिल्यानंतर गांगुर्डे यांनी ती स्वतः स्वीकारून पॅन्टच्या पुढील उजव्या खिशात ठेवली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम जप्त केली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, ला.प्र.वि., जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.