दुष्काळसदृश्य स्थितीत पिकांच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी थेट बांधावर..
फेकरी येथे कापूस पीक कापणी प्रयोग; भुसावळ-जामनेर तालुक्यात विविध पिकांचा घेतला आढावा

जळगाव : जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांची सद्यस्थिती, उत्पादनक्षमतेवरील परिणाम आणि संभाव्य उत्पादनाचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ व जामनेर तालुक्यांतील विविध गावांना भेट देत पिकांची पाहणी केली.

मौजे फेकरी येथे कापूस पिकाच्या पहिल्या वेचणीचा पीक कापणी प्रयोग जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कापूस वेचणी करून प्रयोगाच्या प्रक्रियेची पाहणी केली. प्रयोगातून मिळालेल्या उत्पादनाची नोंद सीसीई प्रणालीमध्ये करण्यात आली. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत उत्पादनाची नोंद घेण्यात आली.
यानंतर कुऱ्हापानाचे येथे कापूस, सोयाबीन व मका पिकांच्या प्रक्षेत्रांची पाहणी करून पिकांची वाढ, सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनाबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. चोरवड येथे सोयाबीन व मका, तर जामनेर तालुक्यातील महुखेडा येथे मका, सोयाबीन व तूर पिकांची पाहणी करण्यात आली.
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पिकांवर झालेला परिणाम, जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकांची वाढ आणि संभाव्य उत्पादनस्थिती याबाबत क्षेत्रीय पाहणीद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. पीक कापणी प्रयोगातून मिळणारी उत्पादनविषयक माहिती पीकविमा प्रक्रियेसह आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी देखील उपस्थित होते.
