दोधा गावात वृद्ध महिलेचा गळा आवळून खून : सालदार पोलिसांच्या ताब्यात..

रावेर : तालुक्यातील दोधा गावात पैशांची गरज भागविण्यासाठी घरात काम करणाऱ्या सालदाराने त्याच घरातील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन सालदार काहीच घडले नसल्याप्रमाणे वावरत होता. मात्र, रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सालदाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या घटनेत ललिताबाई वसंत पाटील (वय ७२, रा. दोधा, ता. रावेर) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लाला धर्मा भिलाला (वय १९, रा. प्रकाश पाटील यांचा वाडा, दोधा; मूळ रा. नसीराबाद बोरी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर) याच्यावर संशय बळावून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सालदार लाला भिलाला हा पाटील यांच्या घरात सालदार म्हणून काम करीत होता. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर नांदायला येणार नाही, तसेच दुसरे लग्न करणार असल्याचे ती त्याला सांगत असल्याने त्याच्यावर पैशांचा ताण असल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास सालदार घराच्या मागील बाजूने घरात शिरला. घरात एकट्या असलेल्या ललिताबाई यांचा त्याने स्वतःच्या बेल्टने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे हार आणि कानातील दागिने काढून संशयित आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.
विशेष म्हणजे, खून केल्यानंतर संशयित आरोपी काहीच घडले नसल्याप्रमाणे वावरत होता. मात्र, पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याची चौकशी केली असता त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून, त्याने लपवून ठेवलेले दोन गळ्यातील हार व कानातील दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या घटनेमुळे दोधा गावात खळबळ उडाली असून, विश्वासाने घरात कामाला ठेवलेल्या तरुणानेच वृद्ध महिलेचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. रावेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.