सेवा संकल्प अभियाना अंतर्गत व वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या जयंती निम्मीत आदिवासी महिला बचत गटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न..

यावल (प्रतिनिधी )“महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक स्वावलंबन हीच खरी प्रगती” : आमदार राजूमामा भोळे आदिवासी महिलांना उद्योजकते च्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांचा पुढाकार बचत गट, बँक लिंकेज व शासकीय योजनांबाबत तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे सविस्तर मार्गदर्शन
आदिवासी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव देऊन त्यांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच शासकीय योजनांची थेट माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने आज, दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या जयंती निम्मीत्त व सेवा संकल्प अभियाना अंतर्गत आदिवासी महिला बचत गटांच्या भव्य मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन कार्यालयात आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते. या मेळाव्यास परिसरातील शेकडो आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, “कुटुंबाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. आदिवासी भागातील महिला बचत गटांनी आता केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता विविध उत्पादन, प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायांची कास धरली पाहिजे. शासन महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध असून, विविध कल्याणकारी योजना व अनुदानाचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.”1 जुलै 2026 रोजी पासुन 30 जुलै 2026 या कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रु इतका निधीचे(फिरता निधी) वितरण आज करण्यात आलेले असुन त्याबाबत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, , आदिवासी विकास विभाग नाशिक येथील उपआयुक्त राजेंद्र हिवाळे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. सुनिलकुमार दोहरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ललित तावडे, ए.आ.वि.प्र. कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, प्रवीण दाभाडे, मिनाक्षी सुलताने, संदीप पाटील,उमेदचे प्रकल्प अधिकारी हर्ष भोई प्रकल्प कार्यालयाचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, मिलींद पाईकराव, विश्वास गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी महिलांना संबोधित करताना महिला बचत गटांची कार्यपद्धती, अंतर्गत कर्जवाटप, हिशेब नोंदणी व व्यवस्थापन, तसेच ‘उमेद’ अभियानांतर्गत उपलब्ध असणाऱ्या विविध संधी यावर सविस्तर प्रकाश टाकला. महिलांनी गटबांधणीच्या माध्यमातून एकत्रित येऊन स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करावा व पूरक उद्योग सुरू करावेत, असा सल्ला त्यांनी दिला.
याप्रसंगी जिल्हा ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांनी उपस्थित महिलांना बँक लिंकेज, फिरता निधी, सवलतीच्या दरातील कर्जपुरवठा आणि डिजिटल बँकिंग व्यवहारांविषयी तांत्रिक माहिती दिली. महिला बचत गटांनी नियमित कर्जपरतफेड करून आपले क्रेडिट रेटिंग उत्तम ठेवावे, जेणेकरून मोठ्या व्यवसायांसाठी बँकेकडून अधिकचे भांडवल उपलब्ध होणे सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी महिला व बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची रूपरेषा मांडली. आदिवासी भागातील प्रत्येक गरजू महिला घटकाला स्वयंपूर्ण बनवणे हाच प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे व प्रवीण दाभाडे यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
मेळाव्यामध्ये उपस्थित महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी, अनुभव मांडले, ज्याचे उपस्थित मान्यवरांकडून तात्काळ निरसन करण्यात आले.
सुंदर शाळा अभियान:
या कार्यक्रमासोबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळांपैकी ‘सुंदर शाळा अभियाना’अंतर्गत शासकीय आश्रमशाळा मालोद ता.यावल व लालमाती ता.रावेर आणि अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन ता.चोपडा व सतखेडा ता.धरणगाव तसेच शासकीय वसतिगृह रावेर (मुलांचे) व जळगाव नवीन (मुलींचे) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राघोजी भांगरे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार
तसेच ‘राघोजी भांगरे गुणवंत विद्यार्थी पुरस्कारा’ने खालील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले:
• इयत्ता १० वी:
o शासकीय आश्रमशाळा: विराज बारेला (देवझिरी, मुलांमध्ये प्रथम), अरविना बारेला (वैजापूर, मुलींमध्ये प्रथम).
o अनुदानित आश्रमशाळा: अमित पावरा (मेहुणबारे, मुलांमध्ये प्रथम), पल्लवी वसावे (मेहुणबारे, मुलींमध्ये प्रथम).
• इयत्ता १२ वी (कला शाखा):
o शासकीय आश्रमशाळा: शकिल तडवी (वाघझिरा, मुलांमध्ये प्रथम), अर्पिता पावरा (वैजापूर, मुलींमध्ये प्रथम).
o अनुदानित आश्रमशाळा: करेश वळवी (मेहुणबारे, मुलांमध्ये प्रथम), रावता तडवी (कर्जाणे, मुलींमध्ये प्रथम).
• इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा):
o शासकीय आश्रमशाळा: निलेश बारेला (वाघझिरा, मुलांमध्ये प्रथम), अंकिता बारेला (वैजापूर, मुलींमध्ये प्रथम).
o अनुदानित आश्रमशाळा: तन्वीर पावरा (कर्जाणे, मुलांमध्ये प्रथम), रुपाली पावरा (पिंपळे, मुलींमध्ये प्रथम).
उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार
वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला १.श्री. रायभान सूर्यभान तायडे, मुख्याध्यापक, पळासखेडा २. श्री. मनोज हिंमतराव ठाकरे, मुख्याध्यापक, बोरगाव ३. श्री. दिगंबर भिमराव पाटील, अधिक्षक, सोनबर्डी ४. श्री. मनोज पुंडलिक माळी, अधिक्षक, गुढे ५. श्रीम. चारुशिला प्रभाकर महाजन, अधिक्षिका, दहिवद ६. श्रीम. मंगला गोपाळ पाटील, अधिक्षिका, सतखेडा ७. श्री. कृष्णा पुंजाजी ठाकरे, शिक्षक, लालमाती ८. श्री. रमाकांत पोपट कापडणिस, शिक्षक, देवळी ९. श्री. अनिल अंकुश हटकर, वर्ग-4, सोनबर्डी १०. श्री. भिकन ज्ञानेश्वर पाटील, वर्ग-4, कर्जाणे ११. श्रीम. ललिता जयंतराव भारंबे, ANM, लालमाती १२. श्री. विशाल रमेश पाटील, क्रिडा शिक्षक, चांदसर १३. श्री. अभिजित अनिल दिकोंडवार, गृहपाल, नवीन मुलांचे वसतिगृह, जळगाव १४. श्री. संदिप युवराज तायडे, वर्ग-4, पाल १५. श्री. मनोज रामलाल जोनवाल, वर्ग-4, प्रकल्प कार्यालय, यावल १6. श्री. प्रविणकुमार वसंत रोकडे, सहाय्यक लेखाधिकारी, प्रकल्प कार्यालय, यावल १७. श्री. विनोद नारायण पडोळे, कनिष्ठ लिपिक, प्रकल्प कार्यालय, यावल यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उमेद येथेल सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास यावल प्रकल्प कार्यक्षेत्रातील विविध गावांमधील शेकडो बचत गट प्रतिनिधी, महिला लाभार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.