
रावेर (प्रतिनिधी) : शासकीय कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी रावेर वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७, वनरक्षक, जुनोने बीट, अहिरवाडी परिमंडळ, वनपरिक्षेत्र रावेर) असे संबंधित लोकसेवकाचे नाव आहे. बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे रावेर येथील अर्थमुव्हर्स एजन्सीचा व्यवसाय करतात. त्यांच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे रावेर येथील मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहून नेण्याचा परवाना पाटबंधारे उपविभाग, रावेर या कार्यालयाकडून घेतला होता.या कामासाठी तक्रारदार यांनी आपल्या जेसीबी मशीनद्वारे गाळ काढला होता. संबंधित परिसर हा वनरक्षक जगदीश जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जेसीबीद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपये, तर परिचित व्यक्तीने ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. याबाबत तक्रारदाराने २८ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २८ ऑक्टोबर रोजी रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान वनरक्षक जगदाळे यांनी जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या माहितीत नमूद आहे.
त्यानंतर रावेर ते बहानपूर रोडवरील एका ज्यूस सेंटर येथे सापळा रचण्यात आला. या ठिकाणी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनरक्षक जगदाळे यांना एसीबीच्या पथकाने पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन, पोलीस अंमलदार भुषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांनी केली.
दरम्यान, लाचखोरीच्या या प्रकरणामुळे रावेर वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजाबाबत चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.