एमआयडीसी पोलिसांची कारवाई! दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड; चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत..

जळगाव | प्रतिनिधी –जळगाव शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, एका प्रौढ आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यात एका अल्पवयीन बालकाकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
रिलायबल लॉजिंग परिसरातून स्प्लेंडरची चोरी
शनिपेठ परिसरातील रहिवासी तरबेज सैय्यद आसिफ यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता आपली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH-19-T-7770) अजिंठा चौफुलीजवळील इदगाह कॉम्प्लेक्स येथील रिलायबल लॉजिंगच्या खाली पार्क केली होती. काम आटोपून परतल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी सापळा रचून सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
कुसुंबा येथील एचएफ डिलक्सही हस्तगत
दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कैलास पाटील यांची हिरो कंपनीची काळ्या रंगाची एचएफ डिलक्स (क्रमांक MH-19-DS-5140) ही दुचाकी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कुसुंबा शिवारातून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास करून चोरी करणाऱ्या संशयिताचा शोध घेतला. संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याकडून चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल हस्तगत करण्यात आली
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, गजानन महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, सुभाष साबळे, ललित नारखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू बिर्हाडे, दीपक माळी, रविंद्र पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.
एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.