जळगाव जिल्हाबँक निवडणुकीत महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध..

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने बिनविरोध निवडीच्या माध्यमातून आपले राजकीय वर्चस्व दाखवून दिले आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर महायुतीच्या वाट्याला आलेल्या २१ जागांपैकी तब्बल १२ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक सहा, भाजपचे चार, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील राजकीय पकड आणि सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. महायुतीच्या घटक पक्षांनी जागावाटप आणि समन्वयातून निवडणुकीची रणनीती आखल्याने १२ जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक सहा उमेदवार आहेत. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, सुमित किशोर पाटील, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील आणि सोमसिंग खुमानसिंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपच्या वाट्याला चार जागा आल्या असून मंत्री गिरीश महाजन, रोहित निकम, रजनी सावकारे आणि मधुकर राणे हे चारही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सोनल संजय पवार आणि जयश्री अनिल पाटील या दोन उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अशा प्रकारे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व मिळाले आहे.
उर्वरित नऊ जागांसाठी निवडणुक
महायुतीच्या वाट्याला आलेल्या २१ जागांपैकी १२ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित नऊ जागांसाठी पुढील निवडणूक प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या जागांवर कोण बाजी मारणार आणि जिल्हा बँकेच्या सत्तेचे अंतिम चित्र कसे असेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीचा टप्पा पार पडल्यानंतर आता उर्वरित जागांवरील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
शिवसेना शिंदे गट –गुलाबराव पाटील,चंद्रकांत सोनवणे, सुमित किशोर पाटील,मृणाल अमोल पाटील,नलिनी चिमणराव पाटील,सोमसिंग खुमानसिंग पाटील
भाजप –गिरीश महाजन, रोहित निकम, रजनी सावकारे, मधुकर राणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) –सोनल संजय पवार, जयश्री अनिल पाटील