जळगाव

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन..

२२० स्टॉल्समधून उलगडणार आधुनिक शेतीचे नवे दालन..

जळगाव, दि. १९ : बदलते हवामान, वाढती मजूरटंचाई आणि शेतीचा वाढता उत्पादन खर्च अशा आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मात करण्याचा मार्ग दाखवणारे राज्यस्तरीय ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन उद्या (दि. २०) पासून जळगावात सुरू होत आहे. एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात २२० हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन प्रयोग, आधुनिक यंत्रसामग्री आणि कृषीपूरक उद्योगांची माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.

ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनाचे यंदा जळगावातील बारावे वर्ष आहे. गेल्या १४ वर्षांपासून कृषी विस्ताराच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ॲग्रोवर्ल्डने यंदा शेतीबरोबरच कृषीआधारित उद्योग आणि ग्रामीण उद्योजकतेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रदर्शनात प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे.

ड्रोनपासून आधुनिक यंत्रांपर्यंत प्रात्यक्षिके

शेतीतील मजूरटंचाईवर पर्याय म्हणून फवारणी ड्रोन, लहान-मोठी कृषी यंत्रे, आधुनिक औजारे आणि शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचे प्रदर्शन हे यंदाचे प्रमुख आकर्षण असेल. यासाठी ४० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी तंत्रे, सुधारित बियाणे, नॅनो फर्टिलायझर, टिश्यूकल्चर केळीच्या १२ हून अधिक कंपन्या, फळे-भाजीपाला नर्सरी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची माहितीही उपलब्ध होणार आहे.शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, मल्चिंग, विडमॅट तंत्रज्ञान तसेच परसबाग आणि टेरेस गार्डनसाठी विविध रोपांची माहितीही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतीसोबत उद्योग सुरू करण्याची संधी

यंदाच्या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कृषीपूरक उद्योगांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन. ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला सुकविण्यासाठी सोलर ड्रायर, पापड उद्योग आणि दाल मिल यांसारख्या व्यवसायांची माहिती देण्यात येणार आहे. शेतीसोबत प्रक्रिया उद्योग सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे.

याशिवाय मल्चिंगसाठी ३२ हजार रुपये, विडमॅट तंत्रज्ञानासाठी एक लाख रुपये, पशुपालनासाठी पाच ते आठ लाख रुपये, तर मुरघास हार्वेस्टर व बेलरसाठी १३ ते १९ लाख रुपयांपर्यंतच्या अनुदानासंबंधी माहिती दिली जाणार आहे. बँकिंग सुविधा, शासकीय योजना आणि कृषी विभागाच्या अनुदानाबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी निर्मल सीड्सतर्फे पहिल्या पाच हजार शेतकरी व अभ्यागतांना किचन गार्डन बियाण्यांचे पाकीट मोफत देण्यात येणार आहे. तसेच दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून शंभराहून अधिक जणांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून, सिका ई-मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीसही ठेवण्यात आले आहे.जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, अपेडा आणि मेट्रोजन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. तर विविध कृषी कंपन्या आणि संस्थांनी सहप्रायोजक म्हणून सहभाग नोंदविला आहे.

आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान समजून घेण्यासोबतच शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची संधी देणारे हे प्रदर्शन खानदेशातील शेतकरी, तरुण शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे