विश्व महापौर फोरम आणि सातव्या एशियन सिटीज समिटमध्ये महापौर दीपमाला काळे सहभागी होणार..
मुंबईत २५, २६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद : जगभरातून सुमारे १ हजार महापौर उपस्थित राहणार

जळगाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AIILSG) च्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त मुंबईतील फेअरमॉन्ट हॉटेल येथे दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी तिसरा ‘विश्व महापौर फोरम’ आणि सातवी ‘एशियन सिटीज समिट’ ही भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या जागतिक स्तरावरील परिषदेत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे या सहभागी होणार असून, त्या जळगाव शहराचे प्रतिनिधित्व करतील.
या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी जगभरातून सुमारे एक हजाराच्या आसपास महापौर आणि शहरी प्रशासन प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. यामध्ये परदेशातील तब्बल ७५ महापौरांनी आपली अधिकृत नोंदणी केली असून, देशांतील ५०० हून जास्त शहरांचे प्रतिनिधी तसेच देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून विविध महानगरपालिकांचे महापौर, नगरीय संस्थांचे पदाधिकारी, धोरणकर्ते आणि शहरी विकास तज्ज्ञ एकाच मंचावर येणार आहेत.
*महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे व विचारमंथन*
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत शहरी विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारण (पाणी बचत), नद्या आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे पुनरुज्जीवन,
पर्यावरण संरक्षण आणि ‘नेट झिरो सिटी’ची निर्मिती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि शहरी वाहतूक व्यवस्था, नागरी प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) भूमिका, महानगरीय व्यवस्थापन आणि हवामान बदलाची आव्हाने याविषयी चर्चा होईल.या जागतिक परिषदेतील सहभागामुळे जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी आणि आधुनिक नागरी सुविधांच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची मोठी संधी महापौर दीपमाला काळे यांना मिळणार आहे.