जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे थाटात उदघाटन..
२२० हून अधिक स्टॉल्समधून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची पर्वणी; ॲग्री स्टार्टअप आणि कृषी प्रक्रिया उद्योग ठरताहेत आकर्षण

जळगाव : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन आणि प्रगत कृषी पद्धतींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ॲग्रोवर्ल्ड राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि. २०) एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे थाटात उद्घाटन झाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रात नव्या संधी शोधणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन २३ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाटील बायोटेकचे प्रमोद पाटील, मेट्रोज बायोटेकचे प्रियंक शहा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, हिरा रोटोचे भूषण खडके, मेट्रोजन बायोटेकचे युवराज वाला आणि ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते. देशभरातील कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ॲग्रोवर्ल्डचे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील कंपन्यांना थेट संवाद साधण्याची तसेच आपल्या उत्पादनांची माहिती देण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होते, असे मत डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
यंदाच्या प्रदर्शनात २२० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यामध्ये सुमारे ४० स्टॉल्स कृषी यंत्रे आणि औजारांचे आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, पाण्याची कमतरता आणि उत्पादन खर्चातील वाढ या समस्यांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रदर्शनात विशेष भर देण्यात आला आहे.
ड्रोन, आधुनिक यंत्रे आणि टिश्यूकल्चर केळीचे आकर्षण
शेतीकामासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने फवारणीसाठी ड्रोन, विविध प्रकारची कृषी यंत्रे आणि आधुनिक औजारांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. कमी पाण्यात आणि कमी श्रमात अधिक उत्पादन घेण्यास मदत करणारे तंत्रज्ञान, विविध पिकांमधील करार शेती, टिश्यूकल्चर केळीच्या १२ हून अधिक कंपन्या, फळे व भाजीपाला नर्सरी, सुधारित बियाण्यांचे वाण आणि नॅनो फर्टिलायझर यांची माहिती येथे उपलब्ध आहे.याशिवाय शेततळ्यांचे अस्तरीकरण, सोलर फार्मिंग, शेततार कुंपण, झटका मशीन, किचन गार्डन टूल्स, परसबाग आणि टेरेस गार्डनसाठी विविध रोपे यांचेही स्टॉल्स आहेत. बँकिंग सुविधा, शासकीय योजना, कृषी विभागाचे अनुदान आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे.
ॲग्री स्टार्टअप आणि प्रक्रिया उद्योगांना तरुणांची पसंती
प्रदर्शनातील ॲग्री स्टार्टअप, कृषी प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला सुकविण्यासाठी सोलर ड्रायर मशीन तसेच पापड उद्योगाचे स्टॉल विशेष आकर्षण ठरत आहेत. पहिल्याच दिवशी उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी या स्टॉल्सना भेट देत व्यवसायाच्या नव्या संधींची माहिती घेतली. शेतीला पूरक उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी या प्रदर्शनातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळत आहे.जळगावमध्ये ॲग्रोवर्ल्डचे यंदा १२ वे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.
दुष्काळी स्थितीतही उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान : प्रमोद पाटील
यंदा दुष्काळी परिस्थिती असली, तरी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून शेतीतून अधिक उत्पादन कसे घेता येईल, यावर प्रदर्शनात भर देण्यात आला आहे. देशभरातील कंपन्यांसह राज्यातील नामांकित कृषी कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे. विशेषतः केळी, पपई, हळद आणि कांदा या पिकांचे प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पादन घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाटील बायोटेकनेही लागवडीपासून काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले असून, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीचे प्रमोद पाटील यांनी केले.