जळगाव

वर्ल्ड मेयर फोरमसह महिला परिषदमध्ये जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचा प्रभावी सहभाग; जागतिक व्यासपीठावरून मांडले ‘फ्युचर-रेडी’ व्हिजन..

नागरिकांच्या चेहऱ्यावरील हसू हेच खऱ्या नेतृत्वाचे यश : महापौर काळे यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी) : मुंबई येथे आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर फोरम’ आणि त्यासोबतच्या ‘चौथ्या महिला नेतृत्व कार्यशाळेत’ जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सहभाग घेत जळगाव शहराची ओळख आणि विकासात्मक दृष्टिकोन देश-विदेशातील मान्यवरांसमोर मांडला. या व्यासपीठावरून त्यांनी मांडलेल्या विचारांचे आणि नेतृत्वाच्या अनुभवांचे उपस्थित महापौरांकडून कौतुक झाले.

*सशक्त ओळख आणि महापौरपदाची जबाबदारी*

आपल्या भाषणात महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव शहर भारतातील ‘केळीचे शहर’ म्हणून ओळखले जाते तसेच भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी जोडलेली भूमी असल्याचे अभिमानाने नमूद केले. महापौरपद हे केवळ मानाचे पद नसून शहरातील प्रत्येक नागरिकाप्रती असलेली मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*नागरिकांच्या सोबत उभे राहणे महत्त्वाचे*

महिला महापौर म्हणून काम करताना विश्वासार्हता सिद्ध करणे आणि कठीण निर्णय घेण्याची क्षमता दाखवण्यासाठी कधीकधी अधिक परिश्रम घ्यावे लागतात, असे त्या म्हणाल्या. मात्र, नेतृत्व धाडस, बांधिलकी आणि काम करून दाखवण्याच्या क्षमतेवर आधारित असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेतृत्व म्हणजे लोकांच्या वर उभे राहणे नव्हे, तर त्यांच्यासोबत उभे राहणे होय. आपले यश पदावर मोजले न जाता, आपले शहर योग्य दिशेने जात असल्याच्या समाधानाने नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हसण्यात मोजले जाते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच आयुक्त आणि अधिकाऱ्यांशी मोकळा संवाद, परस्पर आदर व सांघिक भावनेतून शहराच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर त्यांनी भर दिला.

*महिलांचे जागतिक नेटवर्क आणि तरुणींना संदेश*

स्वच्छता, आरोग्य, पाणी, सुरक्षितता, शिक्षण आणि पर्यावरण यांसारख्या दैनंदिन बाबी महिला जवळून समजून घेतात. त्यामुळे महिलांकडे केवळ विकासाच्या लाभार्थी म्हणून न पाहता निर्णय घेणाऱ्या आणि शहरी परिवर्तनाच्या सूत्रधार म्हणून पाहिले जावे, असे मत त्यांनी मांडले. विविध देश व शहरांतील महिला महापौरांनी एकत्र येऊन यशस्वी कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी मजबूत जागतिक नेटवर्क उभारावे, असे आवाहन त्यांनी केले. नेतृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींनी संधीची वाट न पाहता स्वतःला तयार करून पुढे पाऊल टाकावे आणि इतरांसाठीही संधीची दारे खुली करावीत, असा संदेश त्यांनी दिला.

*जळगावसाठी ‘फ्युचर-रेडी’ दृष्टिकोन*

जळगाव हे स्वच्छ, हरित, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज शहर म्हणून नावारूपाला यावे, जिथे तंत्रज्ञान लोकांच्या सेवेत असेल आणि विकास समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल, असे स्वप्न त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’चा नारा देत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे