जळगाव

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज :२३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

जिल्ह्यात ३५६४ मतदान केंद्र १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग

 

जळगाव, दि.२१ – जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. उद्या (दि.२३ जानेवारी) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या पुरूष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणूकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे.

जिल्ह्यात शहरी भागात १०६९ व ग्रामीण भागात २४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २०३८ ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १५०० च्या वर आहे. १७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही.सध्याच्या जिल्ह्यात ९३३९ बॅलेट युनिट, ५४५० कंट्रोल युनिट आणि ५७३३ व्हीव्हीपीएटी मशिन उपलब्ध आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या ४७,४०,८८२ इतकी आहे. यात ३४,९१,०९८ मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये १८,१२,००७ पुरूष तर १६,७८,९५६ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी १३५ मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग १९२११ मतदार आहेत. ८० वर्षांवरील वयोमान असलेले १,०३,१२९ मतदार आहेत.

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या गैरहजर मतदाराने सर्व तपशील भरून फॉर्म १२डी द्वारे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी (RO) कडे अर्ज करावा लागेल. पोस्टल बॅलेट सुविधेची मागणी करणारे असे अर्ज निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपासून संबंधित निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच दिवसांच्या कालावधीत आरओकडे पोहोचले पाहिजेत.असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.दोन मतदान अधिकार्‍यांचा समावेश असलेले मतदान पथक, एक व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, मतदाराच्या घरी भेट देतात आणि मतदानाची संपूर्ण गुप्तता राखून मतदाराला पोस्टल बॅलेटवर मतदान करण्यास सांगतात. असे मतदार घरबसल्या मतदान करू शकतात. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा ७२ टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर १००० पुरुषांमागे ९२७ महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे.२७ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या १६२२९ वरून ३८२९६ झाली आहे.

२०२२ पासून जिल्ह्यात एकूण ६३७११ मतदारांची वाढ झाली आहे. २४३०१५ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर ३,०६,७२६ मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.नवीन निवडणूक फोटो ओळखपत्र २,९१,१७१ छापण्यात आले आहेत. टपाल विभागाकडून २,३६,०११ निवडणूक छायाचित्र ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ५५,१६० कार्डचे लवकरच वितरण केले जाणार आहे. असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व मतदार जागृती कार्यक्रमाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तयारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे