
एरंडोल – तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोमवारी सायंकाळी भीषण हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला. दोन गटांमध्ये झालेल्या या मारामारीत एकूण १३ जण जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, देवी विसर्जन मिरवणुकीत धक्काबुकीच्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. क्षणातच हा वाद चिघळत मोठ्या हाणामारीत परिवर्तित झाला. दोन्ही गटातील युवकांनी परस्परांवर दगडफेक आणि लाठी-काठ्यांनी हल्ला केल्याने काहींच्या डोक्याला आणि हात-पायांना गंभीर दुखापती झाल्या.
या घटनेत दोन्ही बाजूंचे एकूण १३ जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सर्व जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.उपचारासाठी जखमींना दाखल केल्यानंतर दोन्ही गटातील लोक रुग्णालयात पुन्हा आमनेसामने आले. त्यातून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हापेठ पोलिसांना तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेनंतर खेडी कढोली गावात पोलिसांचा जोरदार बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त ठेवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत सहभागी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.