श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल..
शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावर लावलेला जीएसटी काढू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आश्वासन
जळगाव ( प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे, यामुळे आगामी काळात दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या मालावर आणि अवजारांवर लावलेला १२ ते २४ टक्के जीएसटी काढून टाकू अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज जळगाव मध्ये बोलताना केली. रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जमलेल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरमधून श्रीराम पाटील आणि करण पाटील या दोन उमेदवारांसह मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार श्रीराम पाटील, करण पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रसेनजीत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री पाटील पुढे म्हणाले की,रावेर लोकसभा मतदार संघातून श्रीराम पाटील आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फोडल्यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात दूध संघ शेतकऱ्यांना केवळ २४ रुपये लिटरचा भाव देतो. मात्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ३४ ते ३५ रुपये लिटरचा भाव दुधाला मिळतो. शेतमालाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हुकूमशाही उलथवून टाका : राऊत
खासदार संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. दरवर्षी दीड कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा करून हे सरकार सत्तेवर आले. मात्र दरवर्षी दीड लाख लोकांनाही युवकांनाही रोजगार दिला नाही. गद्दारी करून सत्तेवर आलेल्या या पक्षाला निष्ठावंतांची ताकद दाखवा व हुकूमशाही उलथून टाका. श्रीराम पाटील आणि करण पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम पाटील यांच्यावर पक्षांतराचा आरोप करणाऱ्यांवर टीका केली. भारतीय जनता पक्षाचे इतके मोठे कार्यालय इथे उभे राहिले, हा इतका पैसा कुठून आणला? असा प्रश्न विचारून शेतकरी हितासाठी कर्जमाफी करणाऱ्या शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक आता जनतेने हाती घेतली असून जनता आता विरोधकांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.