जळगाव : जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज पत्रकार परिषदेत महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जाहीर केले.यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार रक्षाताई खडसे यांचे पारडे जड झाले आहे.
विशेष म्हणजे कालच सुरेशदादा जैन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा करून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली होती.
आज पत्रकार परिषदेत सुरेशदादा जैन यांनी सांगितले की, वयोमानानुसार व तब्येतीच्या कारणास्तव राजकीय रणांगणात उतरायची इच्छा नाही.नवीन विकसित भारतात जळगाव जिल्ह्याला मानाचे स्थान मिळावे म्हणून यापुढे मार्गदर्शकाची भूमिका घेईल.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा घोषित करताना सांगितले की, सन्माननीय मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारत घडावा व मी पाहिलेले विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत आहे.माझ्यावर प्रेम करणाऱ्या जिल्हावासियांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांना मतदान करून विजयी करावे.