भादलीत माजी उपसरपंचाचा धारदार शस्त्राने निघृण खून..
जळगाव – तालुक्यातील भादली गावात शुक्रवारी सकाळी घडलेल्या थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. ३६ वर्षीय माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा तिघांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
मृत युवराज सोपान कोळी (वय ३५, रा. कानसवाडा, ता. जळगाव) हे भादली येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी यांचा गुरुवारी रात्री काही जणांसोबत वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले. शुक्रवारी सकाळी तिघांनी धारदार चाकू व चॉपरने त्यांच्यावर सपासप वार करत जीवघेणा हल्ला चढवला.
प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यासमोरच हल्ला हा थरार काही शेतकऱ्यांच्या समोर घडला. मारेकरी वार करून घटनास्थळावरून फरार झाले, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवराज कोळी यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश हत्या झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक, गावकरी व समर्थकांनी मोठ्या संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. संतप्त नातेवाईकांनी आक्रोश करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. मयत युवराज कोळी हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.