छावा मराठा युवा महासंघाचा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियमावर आक्षेप बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
जळगाव – छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम या विधेयकातील असंवैधानिक तरतुदींविरोधात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेने हा कायदा लोकशाही मूल्यांविरोधात असल्याचे सांगत, तो तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य (अनुच्छेद १९(१)(अ)), शांततामय आंदोलनाचा हक्क (अनुच्छेद १९(१)(ब)), संघटन स्वातंत्र्य (अनुच्छेद १९(१)(क)), तसेच न्यायिक प्रक्रिया आणि स्वायत्त न्यायव्यवस्थेच्या संकल्पनेला हा कायदा धक्का पोहोचवत असल्याचे महासंघाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. संघटनेने “Romesh Thapar v. State of Madras (1950)” आणि “Maneka Gandhi v. Union of India (1978)” यासह इतरही सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा दाखला देत, सरकारविरोधातील टीका करणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असल्याचे ठामपणे मांडले. सदर विधेयक हे सरकारविरोधी मतप्रदर्शन दडपण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. तसेच, “बेकायदेशीर कृत्य” ही संकल्पना अस्पष्ट असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले. निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
1) संविधानाच्या चौकटीत राहून नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षित करावेत आणि हे विधेयक त्वरित मागे घ्यावे.
2) सार्वजनिक हिताच्या कारणास्तव शांततामय आंदोलने आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालू नये.
3) सरकारविरोधी मतप्रदर्शन म्हणजे बेकायदेशीर कृत्य असा चुकीचा अर्थ लावू नये.
4) न्यायालयीन प्रक्रियेला बायपास करण्याचा अधिकार प्रशासनाला देऊ नये. स्वायत्त न्यायव्यवस्थेच्या संकल्पनेला कोणताही धक्का लागू नये.
निवेदन देतांना छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष विवेक खर्चे, किरण ठाकूर, जिजाऊ ब्रिगेडच्या शहर प्रमुख प्रा. जयश्री देवरे, प्रा. नीता पाटील, छावा मराठा युवा महासंघ महिला आघाडी महानगर उपाध्यक्षा विद्या झनके, उषाबाई इंगळे उज्वला सपकाळे, प्रमिला इंगळे, भीमराव सोनवणे, शांताराम अहिरे, रवींद्र सोनवणे, आनंद महिरे, उज्वल झनके, कुणाल भावसार, श्रावण सपकाळे आदि उपस्थित होते.