पिंप्राळ्यात मोठया प्रमाणात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा जप्त..
जळगाव – घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा करून ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (२८, रा. वीर सावरकर नगर, पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेत १९ गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई २७ जून रोजी वीर सावरकर नगरात करण्यात आली. या प्रकरणी शाह याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पिंप्राळा परिसरातील वखारीजवळ एका व्यक्तीच्या घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या साठा केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले.
पोलिसांनी छाप्यात शाह याच्या घरातून आठ भरलेले व ११ रिकामे असे एकूण १९ गॅस सिलिंडर, दोन वजनकाटे व एक रेग्युलेटर असा एकूण ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाने पिंप्राळा परिसरातील वखारीजवळील वीर सावरकर नगरातील एका घरात छापा टाकला असता तेथे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरसह वजन काटा आढळून आला. हे साहित्य जप्त करण्यासह वसीम शाह याला ताब्यात घेतले. गॅस सिलिंडर कुठून घेतले याविषयी पोलिसांनी शाह याच्याकडे विचारणा केली, मात्र त्याने कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही. याप्रकरणी पोलिस नाईक सूर्यवंशी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे