रामानंद पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..
जळगाव,- शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. गेली अनेक वर्षे भाड्याच्या इमारतीत कार्यरत असलेले हे पोलीस स्टेशन आता सुमारे ४ कोटी रुपये खर्चून अवघ्या १५ महिन्यांत बांधलेल्या स्वतंत्र व ‘कॉर्पोरेट लूक’ असलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी भौतिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बीट हवालदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व वेगवान होणार आहे.”
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, आदी उपस्थित होते.