जळगाव

२ ऑगस्टला बालरंगभूमी परिषदेतर्फे साजरा होणार बालकलाकारांचा हक्काचा दिवस..

जळगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण भारतामध्ये मराठी बालरंगभूमीची समृध्द परंपरा असून, मराठी बालनाट्यालाही ६६ वर्षांची समृध्द परंपरा लाभली आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वात जास्त प्रयोग महाराष्ट्रात होत असतात. २ ऑगस्ट १९५९ रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली आहे.

बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था असून, या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मराठी बालनाट्य दिवसानिमित्त बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात नटराज व रंगमंच पूजन, नाट्यछटा व स्वगत सादरीकरण व त्यानंतर नाट्यगृहापासून काव्यरत्नावली चौकापर्यंत बालनाट्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला शहरातील बालक, बालकलावंत, पालक, शिक्षक, बालप्रेक्षक व रंगकर्मींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकलावंतांचा हक्काचा दिवस उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, अमोल ठाकूर, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, पंकज बारी, दिपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, सुरेखा मराठे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

का साजरा केला जातो मराठी बालनाट्य दिवस

रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता. इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली. रत्नाकर मतकरींप्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य, या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येवून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे