80 हजाराची लाच : रिंगणगाव सरपंच ACB च्या जाळ्यात..

जळगाव, (प्रतिनिधी) : जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा हस्तांतर करारनामा करण्यासाठी तक्रारदार शासकीय ठेकेदाराकडे एक लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८० हजार स्वीकारल्याप्रकरणी एसीबी यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत रिंगणगाव येथील सरपंच भानुदास पुंडलिक मते यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्यासह दोन खाजगी इसमांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ₹१,५०,२३,३२१/- च्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण केले होते. त्यांना या कामापोटी यापूर्वी ₹१,२७,२३,३२१/- मिळाले होते, परंतु उर्वरित अंदाजे ₹२३,००,०००/- चे अंतिम देयक प्रलंबित होते. हे देयक मिळवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांचा हस्तांतर करारनामा आवश्यक होता. तक्रारदार यांनी यासाठी सरपंच भानुदास पुंडलिक मते आणि ग्रामपंचायत सदस्याचे पती समाधान काशिनाथ महाजन यांची भेट घेतली असता, त्यांनी हस्तांतर करारनामा करून देण्यासाठी ₹१,००,०००/- लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ०६/१०/२०२५ रोजी ला.प्र.वि., जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, समाधान महाजन आणि सरपंच भानुदास मते यांनी ₹८०,०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दि. ०७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सापळा रचला. यावेळी सरपंच भानुदास मते आणि समाधान महाजन यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम संतोष नथ्थु पाटील याने तक्रारदार यांचेकडून ₹८०,०००/-लाचेची रक्कम स्वीकारली. एसीबीच्या पथकाने त्यांना लागलीच रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी भानुदास पुंडलिक मते , सरपंच समाधान काशिनाथ महाजन आणि संतोष नथ्थु पाटील यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ला.प्र.वि. जळगांवचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना. बाळु मराठे, पोकॉ. अमोल सुर्यवंशी यांनी केली.