जळगावात भरदिवसा तरुणाचा धारदार शस्त्राने खून…

जळगाव – शहरातील गोलाणी मार्केट परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, ३१ डिसेंबर असल्याने साई दुपारी गोलानी मार्केट परिसरात गेला होता. याच संधीचा फायदा घेत शुभम सोनवणे संशयित आरोपी याने गोलाणी मार्केट परिसरात साईवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात साई गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याची प्राणज्योत मालविली. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयात आई-वडिलांचा हृदयद्रावक आक्रोश ऐकायला मिळाला.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.