वर्षभरात जळगाव ACB ची धडाकेबाज कामगिरी : ४५ कारवायात ७८ लाचखोर ACB च्या जाळ्यात..
महसूल विभागात सर्वाधिक कारवाया..

जळगाव :लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन २०२५ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी आणि ठोस कारवाई करत एकूण ४५ सापळा कारवायांद्वारे ७८ आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. विविध शासकीय विभागांमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीवर आळा घालण्यासाठी विभागाने वर्षभरात ही कारवाई केली असून, मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झालेली आहे.
या ४५ सापळा कारवायांमध्ये अटकेत आलेल्या एकूण आरोपींमध्ये वर्ग १ चे ३, वर्ग २ चे ६, वर्ग ३ चे ३५, वर्ग ४ चे ४, इतर लोकसेवक १३ तसेच १७ खाजगी इसमांचा समावेश आहे. यावरून लाचखोरी केवळ शासकीय अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नसून, खाजगी इसमांच्या माध्यमातूनही शासकीय कामांसाठी लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सन २०२५ मध्ये जळगाव घटकाकडून विविध विभागांमध्ये कारवाई करण्यात आली. त्यामध्ये महसूल विभागात ७ कारवायांमध्ये १३ आरोपी, जिल्हा परिषद विभागात ५ कारवायांमध्ये ६ आरोपी, पोलीस विभागात ५ कारवायांमध्ये ९ आरोपी, वीज वितरण विभागात ५ कारवायांमध्ये ५ आरोपी, वन विभागात ३ कारवायांमध्ये ९ आरोपी, सरपंच पदाशी संबंधित ३ कारवायांमध्ये ९ आरोपी, तसेच शिक्षण विभागात ४ कारवायांमध्ये ७ आरोपी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय महानगरपालिका 1 कारवाई मध्ये 2 आरोपी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ1 कारवाई मध्ये 2 आरोपी, राज्य परिवहन महामंडळ1 कारवाई मध्ये 1 आरोपी, भूमी अभिलेख 1 कारवाई मध्ये 1 सार्वजनिक आरोग्य विभाग 1 कारवाई मध्ये 1 आरोपी , महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र 1 कारवाई मध्ये 1 आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभाग,1 कारवाई मध्ये 2 आरोपी नगरपालिका 2 कारवाई मध्ये 4 आरोपी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर लोकसेवक व खाजगी इसम यांच्याविरुद्धही स्वतंत्र सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत. एकूण मिळून ४५ सापळा कारवायांमध्ये ७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तुलनात्मक पाहता, सन २०२४ मध्ये ३७ गुन्ह्यांमध्ये ६१ आरोपींवर कारवाई करण्यात आली होती. मात्र सन २०२५ मध्ये ही संख्या वाढून ४५ गुन्हे व ७८ आरोपी इतकी झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ८ अधिक सापळा कारवायांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ही वाढ भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी निर्भिडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रारदारांची गोपनीयता राखली जाईल, असे आश्वासनही विभागाकडून देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक भारत तांगडे, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव ला.प्र.वि. चे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने केली आहे.